शुक्रवार, २५ नोव्हेंबर, २०११

आयुर्वेद व्यासपीठ: संकल्पना व उद्दिष्टे

आयुर्वेद व्यासपीठ: संकल्पना व उद्दिष्टे

1. विद्यार्थ्यांपासून संस्थाचालकांपर्यंत, औषधीवनस्पतींची लागवड करणार्‍यांपासून कारखानदारांपर्यंत व वैद्यक व्यावसायिकांपासून शासकीय यंत्रणेपर्यंत आयुर्वेदाशी संबंधित सर्व घटकांना एका सुत्रात गुंफणारे ‘व्यापक संघटन’.
2. शालेय विद्यार्थ्यांपासून जनसामान्यांपर्यंत आयुर्वेद पोहोचवणारा व दैनंदीन जीवनात आयुर्वेद रुजवणारा प्रचार, प्रसार व लोकशिक्षणाचा ‘व्यापक उपक्रम’.
3. आयुर्वेदाच्या अंगभूत सामर्थ्याची प्रचिती जागवून आयुर्वेद व्यावसायिकांमध्ये उत्साह, आत्मविश्वास व स्वाभिमान निर्माण करण्याचा ‘प्रामाणिक प्रयत्न’.
4. आयुर्वेदाच्या क्षेत्रातील विभिन्न समस्यांच्या निराकरणासाठी सातत्याने, निस्वार्थपणे व संघटितपणे संघर्ष करणारी ‘प्रभावी चळवळ’.
5. आयुर्वेदाच्या मूळ अधिष्ठानाचे जतन व संरक्षण करतांनाच माहिती विस्फोटाच्या या कालखंडातील अद्ययावत ज्ञान व नवनवीन आव्हाने समर्थपणे पेलणार्या नव्या आयुर्वेदीय शिक्षणपद्धतीच्या विकासाला चालना देणारे ‘अभ्यासकेंद्र’
6. आरोग्याच्या क्षेत्रातील आजची आव्हाने व सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याच्या समस्या यांच्या निराकरणासाठी प्राचीन संहिता ग्रंथातील ज्ञान, हजारो वर्षांच्या वैद्यपरंपरेचे संचित व आधुनिक वैद्यकतंत्राने विस्तारलेली क्षितिजे या सर्वांच्या सुसुत्र संयोजनातून आयुर्वेदातील संशोधनाला योग्य दिशा व गती देणारे ‘शास्त्रीय विचारमंथन’.
7. वैद्यकीय क्षेत्रातून लुप्त होत असलेला सेवाभाव व नैतिकता पुनश्च प्रस्थापित करून व्यवसायाबरोबरच समाजातील उपेक्षित व दुर्बल घटकांसाठी वेगवेगळ्या माध्यमातून कार्यरत राहाण्याची प्रेरणा देणारे एक ‘संस्कार केंद्र’
8. आयुर्वेदाच्या क्षेत्रात आज देशविदेशात चालणार्‍या अनेक संस्था, संघटना, चळवळी व उपक्रम यांना निखळ स्नेहाने व आयुर्वेद उत्थानाच्या विशुद्ध प्रेरणेने एकत्र आणून समान्वय साधणारे ‘व्यापक व्यासपीठ’
***

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा