शुक्रवार, २५ नोव्हेंबर, २०११

आयुर्वेद व्यासपीठ: दिशा, धोरण आणि उपक्रम

आयुर्वेद व्यासपीठ: दिशा, धोरण आणि उपक्रम

1925 साली संघाच्या रुपाने सुरू झालेल्या राष्ट्रीय पुनरुत्थानाच्या प्रक्रियेला आज विराट स्वरूप प्राप्त झाले आहे. या पुनरुत्थानाच्या प्रक्रियेचे स्वरूप आज विद्यमान असलेल्या समस्या व आव्हानांचे हिंदुत्वाच्या आधारावर निराकरण करून, हिंदू जीवनदर्शनाला अनुरूप आदर्श समाजजीवनाची निर्मिती हे आहे. हिंदू जीवन दर्शन असे मानते की जीवनाचे उद्दिष्ट प्रत्येक व्यक्तीत विद्यमान असलेल्या पूर्णत्वाची त्या व्यक्तिच्या क्षमतेनुसार प्राप्ती करणे हे होय. या पूर्णत्वाच्या प्राप्तीसाठी प्रत्येक व्यक्तीने प्रयत्न करणे हे त्या व्यक्तीच्या जीवनाचे लक्ष्य, तर त्या व्यक्तीच्या प्रयत्नांना पोषक वातावरण निर्माण करणॆ हे समाजाचे कर्तव्य. या अधिष्ठानावर आधारित राष्ट्रीय पुनर्निर्माणाचे प्रयत्न संघप्रेरीत काम करणार्याव संघटनांच्या द्वारे समाजजीवनाच्या विविध क्षेत्रात आज सुरू आहेत. शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, औद्योगिक, राजकीय अशा सर्व क्षेत्रात हे प्रयत्न सुरू आहेत. असेच प्रयत्न वैद्यकीय क्षेत्रातही सुरू आहेत. या प्रयत्नातुनच आयुर्वेद व्यासपिठाचा जन्म झाला आहे.
वैद्यकीय क्षेत्रातील पुनर्निर्माणाचे कार्य करतांना कार्यकर्त्यांना हिंदू जीवनदर्शनातून उत्पन्न झालेले आयुर्वेद व योगाचे अधिष्ठान उपलब्ध आहे. स्वाभाविकच वैद्यकीय क्षेत्रातील पुनर्निर्माणाच्या कार्यात आयुर्वेद व्यासपीठ व म्हणून व्यासपिठाचे कार्यकर्ते अग्रभागी असतील. वैद्यकीय क्षेत्रातील पुनर्निर्माणाचे कार्य करतांना आयुर्वेद व योगाच्या अधिष्ठानावर ठाम राहून पण उपलब्ध माहिती, प्रगती व तंत्रज्ञानाचा उपयोग करून या क्षेत्रातील आजच्या सर्व आव्हानांना तोंड देत नवी रचना उभी करावी लागेल. या जाणिवेतुनच कामाच्या धोरण व उपक्रमांचा विचार करावा लागेल.

नव्या संदर्भात तत्वचिंतन
व्यासपिठाच्या कामाचा विचार करतांना या कामाच्या विविध आयामांचा विचार करावा लागेल. आजच्या काळातही आयुर्वेदाचे अधिष्ठान उपयुक्त, परिणामकारक व कालोचित आहे हे वैद्यकविश्वाच्या आजच्या स्थितीच्या पार्श्वभुमीवर व आजच्या समस्यांच्या संदर्भात प्रभावीपणे व शास्त्रशुद्ध रितीने मांडावे लागेल. एक समग्र, एकात्म, तर्कशुद्ध शास्त्र, एक परिणामकारक, आजच्या सर्वप्रकारच्या वैद्यकीय समस्यांना हाताळण्यास सक्षम व यशस्वी चिकित्सापद्धती व निरामय जीवन जगण्यासाठी एक संपूर्ण जीवनपद्धती अशा विविध प्रकारे ही मांडणी करावी लागेल.

संघटनात्मक उभारणी
वैद्यकीय क्षेत्रातील पुनर्निर्माणाचे कार्य करतांना संघटना उभारणीसाठी व ही मांडणी वैद्यकविश्वापर्यंत व समाजासमोर नेण्यासाठी संपर्क व संघटना बांधणीचा अग्रक्रम ठरवावा लागेल. आयुर्वेद पदवीधरातील आज जे निष्ठेने आयुर्वेदाचा अंगिकार करतात त्यांच्यापासून प्रारंभ करून क्रमश: आज निष्ठेने आयुर्वेदाचा अंगिकार करत नसले तरी आयुर्वेदाचे पदवीधर असलेले अन्य चिकित्सक, आयुर्वेदाची आवड व आयुर्वेदाचा अभ्यास असलेले अन्य वैद्यकप्रणालींचे वैद्यकव्यवसायीक, संघसंबंधित अन्य वैद्यकप्रणालींचे वैद्यकव्यवसायीक व अंतिमत: सर्व वैद्यकव्यवसायीक आज ना उद्या व्यासपिठाच्या कक्षेत आणावे लागतील.

प्रचार आणि प्रसार
एकीकडे वैद्यकविश्वापर्यंत आयुर्वेद पोहोचवतांनाच, दुसरीकडे संपूर्ण समाजासमोरही आयुर्वेदाला नेण्यासाठी प्रचार आणि प्रसाराचे विविध उपक्रम राबवावे लागतील. आहार विहार, दिनचर्या, ऋतुचर्या इ. विषयांवर व्याख्याने, लेख, आकाशवाणी व दूरदर्शनवर सादरीकरण आदि माध्यमातून समाजात आयुर्वेद पोहोचवावा लागेल, रुजवावा लागेल. सर्वसामान्य रोगनिदान शिबिरे व विविध व्याधीनुसार शिबिरांच्या माध्यमातून एक प्रभावी चिकित्सापद्धती म्हणून आयुर्वेदाला व या चिकित्सापद्धतिचा आजचा आधारस्तंभ म्हणून व्यासपिठाला प्रतिष्ठापित करावे लागेल.

शिक्षण
शिक्षणक्षेत्राच्या संदर्भात एकीकडे या क्षेत्रातील अध्यापक, विद्यार्थी, संस्थाचालक अशा विविध घटकांना व्यासपिठाशी जोडण्यासाठी, त्या त्या स्तरावर रचना करण्याच्या कामाबरोबरच या क्षेत्रातील आजच्या समस्या सोडवण्यासाठी विधायक व संघर्षात्मक प्रयत्न करावे लागतील, तर दुसरीकडे शिक्षणपद्धतीतले दोष दूर करून आजच्या सर्व वैद्यकीय आव्हानांना पेलण्यासाठी समर्थ असा स्नातक घडवण्यासाठी सुयोग्य अशा शिक्षणपद्धतीच्या उभारणीसाठी प्रयत्न करावे लागतील. आयुर्वेदेतर चिकित्सा प्रणालींच्या अभ्यासक्रमातही आयुर्वेदाचा योग्य त्या पद्धतीने समावेष व्हावा म्हणून प्रयत्न करावे लागतील.

स्वास्थ्यसेवायंत्रणा
सार्वजनिक स्वास्थ्यसेवा यंत्रणेच्या (Public health services) संदर्भात, आज या क्षेत्रात असलेल्या आयुर्वेदीय घटकांना व्यासपिठाशी जोडणे, या यंत्रणेत व या यंत्रणेद्वारा राबवल्या जात असलेल्या राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमात (National health programmes) आयुर्वेदाला योग्य ते स्थान मिळवून देणे व क्रमश: या संपूर्ण क्षेत्रालाच आयुर्वेदाच्या प्रभावाखाली आणण्याच्या दिशेने प्रयत्न करावे लागतील.

संशोधन
संशोधनाच्या संदर्भात, प्रत्यक्ष संशोधन करण्यासाठी लागणारी संरचना (Infrastructure) व्यासपिठाजवळ नसल्याने – व असणे आजतरी अपेक्षित नसल्याने – व्यासपीठ म्हणून संशोधन करणे शक्य, उचित व आवश्यकही नाही. पण आवश्यक व योग्य त्या विषयांवर संशोधन होण्यासाठी अभासकांना प्रवृत्त करणे, उपयुक्त असे झालेले संशोधन आवश्यकतेनुसार व योग्यतेनुसार आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांसमोर, अभ्यासकांसमोर, अन्य वैद्यकव्यावसायिकांसमोर व समाजासमोर आणण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. आज वैद्यकीय अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी उत्सुक विद्यार्थ्यांच्या प्राधान्यक्रमात आयुर्वेदाला शेवटचे स्थान असते. अशा विद्यार्थ्यांसमोर हे संशोधन योग्य त्या पद्धतीने आले तर हा प्राधान्यक्रम बदलू शकतो व गुणी विद्यार्थी या क्षेत्राला उपलब्ध होऊ शकतात.

सेवा
सेवेच्या संदर्भात आज विभिन्न संस्था संघटनांद्वारा सुरू असलेल्या सेवा प्रकल्पात व्यासपिठाच्या कार्यकर्त्यांचा सहभाग, त्या प्रकल्पात आयुर्वेदाचा अंतर्भाव व पूर्णपणे आयुर्वेदावर आधारित नव्या सेवाप्रकल्पांचा प्रारंभ या दिशेने प्रयत्न करावे लागतील.

समन्वय
हिंदू जीवनदर्शनातून उत्पन्न झालेले आयुर्वेद व योगाचे अधिष्ठान हे वैद्यकीय क्षेत्रातील पुनर्निर्माणाचा आधार असल्याने पुनर्निर्माणाच्या कार्यात आयुर्वेद व्यासपीठ व म्हणून व्यासपिठाचे कार्यकर्ते अग्रभागी असले पाहिजे, इतकेच नव्हे तर आज ना उद्या त्यांनीच या चळवळीतील सर्व अन्य संघटनांमध्ये समन्वय निर्माण केला पाहिजे. व्यासपिठाच्या पुर्वीपासून सुरू असलेल्या विश्व आयुर्वेद परिषद, नॅशनल मेडिकोज ऑर्गनायजेशन (NMO) सारख्या संघटना, आज कार्यरत असलेल्या आरोग्यभारती, वैद्यकीय विद्यार्थी परिषद सारख्या संघटना व वैद्यकीय सेवा प्रकल्प ज्यांच्या कामाचे महत्वपूर्ण अंग आहे अशा सेवाभारती, वनवासी कल्याण आश्रम, विश्व हिंदू परिषद, दीनदयाळ शोध संस्थान, भारत विकास परिषद अशा संघटनाचे कार्य वैद्यकीय क्षेत्रातील पुनर्निर्माणाच्या संदर्भात उपयुक्त, अर्थपूर्ण व फलदायी व्हायचे असेल तर त्यांच्या कामाला आयुर्वेदाचा परिसस्पर्श झाला पाहिजे व ही जवाबदारी आयुर्वेद व्यासपिठालाच पार पाडावी लागेल.
********
(3.10.99 ला मोतीबाग पुणे येथे झालेल्या व्यासपिठाच्या बैठकीत मांडलेल्या विषयाचे प्रारूप)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा