गुरुवार, २४ नोव्हेंबर, २०११

आयुर्वेद व्यासपीठ: अधिष्ठान व कार्याची दिशा

आयुर्वेद व्यासपीठ: अधिष्ठान व कार्याची दिशा

अभ्यासवर्ग: पिंपळद 13.5.2000
संघटनेच्या वाटचालीत अभ्यासवर्गांची योजना ही संघटनेच्या ध्येयधोरणांना आत्मसात करण्यासाठी व संघटनेने स्विकारलेल्या कार्यपद्धतीचे कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी असते. या दृष्टीने आपल्यासाठी दोन्ही संदर्भात कौशल्य संपादन करण्याची ही संधी असते.
कुठल्याही संघटनेची कालोचितता, यथार्थता व सार्थकता ही केवळ त्या संघटनेच्या संदर्भात तपासून पाहाणे पुरेसे नसते, तर तत्कालीन परिस्थितीच्या संदर्भात, समाजाच्या-देशाच्या वाटचालीसाठी-प्रगतीसाठी उपयुक्ततेच्या निकषावर ती तपासावी लागते.
सर्वच संघटना सारख्या नसतात, नसाव्याही. प्रत्येक संघटनेची प्रकृती, प्रवृत्ती वेगळी असते, त्या संघटनेच्या निर्मितीचे प्रयोजन वेगळे असते व त्यानुसार त्या संघटनेचे जिवितकार्यही (Life mission) वेगळे असते. या सगळ्या पैलूंना अनुसरून त्या संघटनेच्या समोरचे लक्ष्य, दिशा व वाटचालीची गती ठरत असते. या संदर्भात आयुर्वेद व्यासपिठाचा विचार कसा करता येईल हे या अभ्यासवर्गात विविध सत्रातून आपल्याला स्पष्ट होईल.
व्यासपिठाची निर्मिती ही एक स्वतंत्र संघटना म्हणून जशी झाली आहे तद्वतच ती नव्या भारताच्या उभारणीच्या विराट चळवळीचे एक अंग या स्वरूपातही झाली आहे. जगाच्या रंगमंचावर भारत आज नव्या भूमिकेत, नव्या स्वरूपात समोर येतो आहे जागतिक आर्थिक व्यवहारात भारताचा निर्यातीचा वाटा 1980-81 साली 5.5% होता, 1996-97 मध्ये तो 10.3% होता. अर्थतज्ञांचे भाकीत असे आहे की अमेरिका आज 1929 सारख्याच भीषण मंदीच्या उंबरठ्यावर उभी आहे, व या मंदीत अमेरिकन अर्थसत्ता कोसळली तर भारत एक महासत्ता म्हणून समोर येऊ शकतो. याचे कारण असे आहे की भारतीय अर्थव्यवस्थेची काही बलस्थाने आहेत.
1. भारतीय अर्थव्यवस्थेचा जागतिक बाजारपेठेशी संबंध कमी आहे.
2. भारतात विदेशी निवेश कमी आहे.
3. भारताच्या एकूण व्यापारात सरकारचे स्थान मर्यादित आहे.
4. भारतातील सुदृढ व्यापारी वर्ग.
या बलस्थानांमुळेच भारतीय अर्थव्यवस्था कारगील युद्धात स्थिर होती व अमेरिकेच्या आर्थिक निर्बंधांनाही पुरून उरली.
राजकीय मुत्सद्देगिरीत आज भारत वरचढ ठरतो आहे. CTBT वर स्वाक्षरीचा विषय असो, सिएटलच्या परिषदेत श्रममानक प्रस्ताव धुडकावण्याचा निर्णय असो किंवा सार्क परिषदेत पाकीस्तानवर मात करणारे डावपेच असोत, भारताच्या राजकीय इच्छाशक्तीचा जगाला प्रत्यय येतो आहे. त्यामुळेच अमेरिकेला नाइलाजाने आर्थिक निर्बंध उठवावे लागले.
संरक्षण सिद्धतेत भारत आज जागतिक दर्जा गाठतो आहे. कारगिलच्या युद्धाने हे सिद्ध केले आहे की भारतीय सैनिक हा जगातला प्रथम श्रेणीचा सैनिक आहे. भारतीय संरक्षण दलात समाविष्ट झालेली त्रिशूल, पृथ्वी, अग्नी, आकाश, नाग सारखी अण्वस्त्रवाहक क्षेपणास्त्रे स्वसंरक्षण व आक्रमकांवर प्रत्याघात करण्यासाठी सज्ज आहेत. विज्ञान आणि तत्रज्ञानात आज भारत आघाडीवर आहे. भारताचा अंतरिक्ष कार्यक्रम आज चंद्रकक्षेत प्रवेश करतो आहे. वैमानिक विरहित स्वनातीत विमानांची निर्मिती असो किंवा अणुसंशोधन असो आज भारत जगात अग्रेसर आहे. उपग्रह निर्मितीच केवळ नव्हे तर उपग्रह प्रक्षेपणाच्या क्षेत्रातही भारत स्वयंपूर्ण झाला आहे, व अतिप्रगत राष्ट्रांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे. अतिप्रगत संगणक निर्मितीत अनुराग, अनुपम, परम व परम दशसहस्त्र सारख्या अतिप्रगत संगणकांनी सिंगापूरच्या आंतर्राष्ट्रीय संगणक तंत्रज्ञान परिषदेत खळबळ माजवली आहे.
विद्याधर गोखल्यांचे गुण व क्षमता पाहून त्यांचे वडील संभाजीराव त्यांना म्हणाले की नागपूरच्या शुक्रवार तलावात डुबक्या मारू नकोस, मुंबईच्या समुद्रात उतर; आणि विद्याधर गोखल्यांनी मुंबईत प्रवेश केला आणि पाहाता पाहाता मुंबईच्या साहित्य विश्वाचे ते अनभिषिक्त सम्राट बनले. आज भारतीय तरूणही आपल्या कर्तृत्वाने सातासमुद्रापार तळपत आहेत. अमेरिकेत आज 32 लाख भारतीय तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आहेत. अमेरिकेतले 38% डॉक्टर्स, 12% शास्त्रज्ञ, नासामध्ये 36%, माय्क्रोसॉफ्टमध्ये 34%, आयबीएममध्ये 28%, इंटेलमध्ये 17% व झेरॉक्समध्ये 13% भारतीय आहेत. लंडनच्या भुयारी रेल्वेच्या आधुनिकीकरणाचे आणि संगणकीकरणाचे काम भारतीय शास्त्रज्ञ करतो आहे.
सांस्कृतिक क्षेत्रातही जगभर भारताचा प्रभाव वाढतो आहे. भारतीय तत्वज्ञान, योग, आयुर्वेद यांचे स्वागत, मागणी व प्रभाव वाढतो आहे. रामकृष्ण आश्रम, विवेकानंद केंद्र, स्वाध्याय चळवळ, महर्षी महेश योगी, विपश्यना, या सर्वांचे काम जगभर वाढते आहे. नेपाळ मध्ये लुंबिनीला हिंदू-बौद्ध संमेलन झाले, त्याला 16 देशातील 550 प्रतिनिधी उपस्थित होते. मार्गदर्शनासाठी शंकराचार्य जयेंद्र सरस्वती, गयेचे भंते ज्ञानजगत, जपानचे भिक्षू उचिदा उपस्थित होते. नालंदा बुद्धविहाराच्या उभारणीत जपान सहाय्य करणार असल्याची घोषणा या प्रसंगी करण्यात आली. इंडोनेशिया या जगातल्या सगळ्यात मोठ्या मुस्लिम देशाचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष अब्दुल वाहीद यांनी निवडून आल्यानंतर अग्रक्रमाने भारताला भेट दिली व भारताबरोबरचे संबंध दृढ करण्याची इछा व्यक्त केली. मलेशिया या मुस्लिम देशातल्या एका खटल्यात मुस्लिमांनी मशिदीजवळच्या एका हिंदू मंदिरातील घंटानादाने नमाजाला अडथळा येतो म्हणून तो घंटानाद बंद करावा अशी मागणी केली होती, न्यायालयाने हे मंदिर 100 वर्षापासून तिथे आहे व त्यामुळे त्याविषयी आता तक्रार करता येणार नाही असा निर्णय दिला. न्यूयॉर्क येथील विश्व हिंदू परिषदेच्या एका कार्यक्रमात बोलतांना तिथल्या राज्यपालांचे सचिव म्हणाले की अमेरिकेतील भारतियांनी “आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगला पाहिजे. तुम्ही जर तुमच्या संस्कृतीविषयी औदासिन्य दाखवले तर तुमच्यापेक्षा अमेरिकेचा अधिक तोटा होईल.” कॅलिफोर्नियातील सॅन दियागो येथील भारतीय तरूण अजय शहा याने सुरू केलेले हिंदू संकेतस्थळ (web site) हे जगातील सर्वाधिक पाहुणे खेचणार्‍या 10 संकेतस्थळांपैकी एक आहे. पूर्वी भारतावर खैबरखिडीतून आक्रमणे झाली, आता सायबरखिंडीतून होताहेत, या आक्रमणाविरुद्ध भारतीय तरुणांनी जय्यत तयारी केलेली आहे.
नव्या भारताचा हा अश्वमेध आज नव्या वैश्विक समीकरणांना जन्म देतो आहे. स्वामी विवेकानंदांनी सुरू केलेला सांस्कृतिक दिग्विजय चरम सिमेकडे वाटचाल करतो आहे, त्यातून हळूहळू एका नव्या विश्वसंस्कृतीची उभारणी होते आहे. या सर्वांचा परिणाम म्हणून जगाचा भारताकडे पाहाण्याचा दृष्टीकोन बदलतो आहे. अटलजी पंतप्रधान झाल्यावर अमेरिकन संसदेत भारतीय लोकशाहीच्या स्वागताचा ठराव 396/4 मतांनी संमत करण्यात आला. Indo-US Waltz (अमेरिकेतील एक संगीतप्रकार) चे नवे युग सुरू झाल्याची चर्चा सुरू झाली. अमेरिकन अध्यक्षांना भारताबरोबर सहकार्य वाढवण्याची विनंती करण्यात आली. अटलजी पंतप्रधान झाल्यावर फ्रांसचे राष्ट्राध्यक्ष जॅक शिरॅक यांनी आगामी काळात भारत महासत्ता होईल असे भाकीत केले. चीनचे राजदूत चाउ गांग यांनी पुण्यात बोलतांना भारत चीन संबंध सुधारण्यावर भर दिला व आपण एकमेकांचे उपयुक्त, विश्वासार्ह सहनिवासी आहोत असे प्रतिपादन केले. 1986 मध्ये मास्कोत भारत महोत्सवाचे उदघाटन करतांना मिखाईल गॉर्बाचेव्ह यांनी भाषणाची सुरूवात गीतेतल्या दुसर्‍या अध्यायातल्या श्लोकांनी केली व गीतेचे तत्वज्ञानच जगाला मार्ग दाखवू शकते असे सांगितले. इंग्लंडच्या पंतप्रधान असलेल्या मार्गारेट थॅचर यांनी इंग्लंडमधील विराट हिंदू संमेलनात बोलतांना कुटुंब संस्थेसारख्या अनेक गोष्टी जगाने भारतीय संस्कृतीकडून शिकण्यासारख्या आहेत असे सांगितले. दक्षिण आफ्रिकेचे नेते नेल्सन मंडेला 27 वर्षांच्या प्रदीर्घ बंदीवासातून सुटल्यावर सर्वप्रथम भारताला भेट देण्याची इच्छा व्यक्त करतात. विश्व इतिहासाचे प्रख्यात भाष्यकार अर्नॉल्ड टॉयन्बी यांच्या द्रष्ट्या शब्दांची प्रचिती या सर्व घटनांमधून येते आहे. त्यांचे शब्द आहेत “मानवी इतिहासाच्या या अत्यंत भयंकर क्षणी मानवजातीसाठी मुक्तीचा एकमेव मार्ग हा भारतीय मार्ग आहे.... भारताच्या शिरावर ही मोठी आध्यात्मिक जवाबदारी आहे.” (At this supremely dangerous moment of human history, the only way of salvation for mankind is an Indian way…. A great spiritual responsibility rests on India. )
जगाच्या रंगमंचावर भारताची ही नवी ओळख होत असली तरी आपल्या देशात काय स्थिती आहे ते विसरून चालणार नाही. कवी विठ्ठल वाघ म्हणतात ‘ चंद्र सूर्य आले जरी हाती, पायाखालची सुटू नये माती ’ सरकारने घेतलेल्या कर्जावरील व्याज पंचाहत्तर हजार कोटी रुपये आहे. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, ओरिसा या राज्यांच्या कर्मचार्‍याना पुढच्या महिन्याच्या पगाराची शाश्वती नसते. बिहारच्या कर्मचार्‍यांना आधीच महिनेनमहिने बिनपगाराची सवय आहे. (संदर्भ:National institute of public finance and policy) देशाची निम्मी लोकसंख्या शहरात राहाते. बहुसंख्य नागरिकांच्या पिण्याचे स्वच्छ पाणी आणि शौचालयासारख्या मूलभूत गरजांचीही पूर्तता होत नाही.
आजपर्यंत समाजात व देशात क्षमता असूनही इच्छाशक्तिच्या अभावामुळे हे चित्र निर्माण झाले. आता हे चित्र बदलते आहे. पोखरणच्या स्फोटानंतर वॉशिंग्टन पोस्ट ने संपादकीय लिहिले “Angry India does it” बिल क्लिंटन म्हणाले “भारताला कोणी dictate करू शकणार नाही”
देशाच्या ह्या सुप्त क्षमतेला मूर्तरूप देऊन नव्या भारताची उभारणी करण्याचे काम केवळ राजकीय नेतृत्वाचे नाही, तर या समाजाचे चित्र बदलवून टाकण्यासाठी कृतसंकल्प संघटनांनाही ही जवाबदारी स्विकारावी लागेल. त्यासाठी संघटना तशी घडवावी लागेल.
संघटना जर प्रभावी व्हायची असेल तर संघटनेत शक्ती हवी. संघटनेची शक्ती संघटनेच्या सिद्धांतांवर निष्ठा ठेवणार्‍या कार्यकर्त्यांच्या संख्येवर, त्यांच्या कार्यक्षमतेवर व कामातील सातत्यावर अवलंबून असते. या सर्व गोष्टी संपर्कावर अवलंबून असतात. बैठकीत अचानक दिवे गेले, कोणीतरी घाइघाईत मेणबत्ती लावली, ती खाली पडली, कारण मेणबत्ती उभी करण्यापूर्वी खाली पुरेसे पातळ मेण लावले नव्हते. संघटना उभी करण्यासाठी संपर्काचे मेण आवश्यक असते. पण तो संपर्क स्नेहपूर्ण असावा, नि:स्वार्थ असावा.
संघटना वाढवण्यासाठी आपल्या सिद्धांतांवर आपली अभेद्य निष्ठा ठेवतांनाच आपला व्यवहार मात्र विरोधकांनाही जिंकणारा असावा. 1984 मध्ये इंग्लंडच्या 48 शहरातून आलेल्या 1200 स्वयंसेवकांचा विशाल हिंदू संगम ब्रॅडफर्डला सुरू होता. त्याच्या विरोधात खलिस्तानवादी शिखांची निदर्शने सुरू होती. घोषणा देऊन थकलेल्या निदर्शकांना संयोजकांनी अल्पाहारासाठी निमंत्रित केले. आत लावलेल्या प्रदर्शनीत जेंव्हा निदर्शकांनी शीख पंथाच्या दहा गुरूंच्या प्रतिमा पाहिल्या तेंव्हा त्यांना आपली चूक लक्षात आली. त्यांनी संयोजकांना दुसर्‍या दिवशी निघणार्‍या मॅरॅथॉन स्पर्धेचा शेवट गुरुद्वारापाशी करावा अशी विनंती केली व तिथे त्यांच्यातर्फे अल्पाहाराची व्यवस्था होईल असे सागितले. 1967 संघाच्या महाशिबिरात एका स्वयंसेवकाने जनसंघाचे महामंत्री असलेल्या दीनदयाळजींना प्रश्न विचारला ‘येणार्या. निवडणुकीत किती ठिकाणी आपले किती लोक निवडून येतील?’ पंडीतजी म्हणाले ‘स्वयंसेवक म्हणून विचारत असशील तर सर्व ठिकाणी आपलेच लोक निवडून येतील. जनसंघाच्या दृष्टीने विचारत असशील तर वेगळा हिशोब करावा लागेल.’
संघटनेचे काम करतांना आजुबाजुच्या स्थितीचे, समाजाचे भानही हवे. आचार्य नागार्जुनांनी दोन शिष्यांना तीन दिवसात एक रसायन सिद्ध करण्याचे काम दिले. तीन दिवसानंतर दोन्ही शिष्य परत आले. पहिल्याने सांगितले की घरी आई आजारी होती, वडील पंगू आहेत, शेजारच्या घरात एकाचा डोळा फुटला होता, पण मी कोणाकडेही लक्ष न देता तुमच्या आज्ञेप्रमाणे रसायन सिद्ध करून आणले आहे. दुसरा शिष्य म्हणाला की आईवडील आजारी होते, त्यांची शुश्रुषा केली, गावात पटकीची साथ आली होती, त्यासाठी गावकर्‍याना मदत करण्यात वेळ गेला, त्यामुळे रसायन सिद्ध करायला वेळच मिळाला नाही. आचार्यांनी दुसर्‍या शिष्याची पाठ थोपटली.
नव्या भारताची आधारशीला, भारताचे सांस्कृतिक अधिष्ठान काय आहे हे समजून घ्यावे लागेल. भारतीय संस्कृतिच्या वाटचालीत पिढ्यानपिढ्या मानवाचे, मानवी समाजाचे, सभोवताल असलेल्या सृष्टीचे व या सर्वांचे नियमन करणार्‍या मूलभूत नियमांचे खरे स्वरूप काय याचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. या शोधात गवसलेल्या सत्त्याच्या प्रकाशात या मूलभूत नियमांच्या - ज्यांना धर्म संबोधण्यात आले- आधारे व्यक्तीच्या व मानवी समाजाच्या जीवनात परिवर्तन करून ते अधिकाधिक सुखी, आनंदमय व परिपूर्ण करण्याचा प्रयत्न केला गेला. प्रत्येक व्यक्तीची प्रकृती व स्वरूप भिन्न असल्याने, त्याच्या जीवनात या मूलभूत नियमांना अनुसरण्याचा मार्ग – याला त्या व्यक्तीचा धर्म संबोधण्यात आले – भिन्न असेल हे लक्षात घेऊन सुखी, आनंदमय व परिपूर्ण जीवनाच्या लक्ष्याकडे वाटचाल करण्याचे अगणित मार्ग भारतीय संस्कृतिच्या वाटचालीत विकसित झाले. दुर्गा सप्तशतीत याचे सुंदर वर्णन आहे “ऋचिनां वैचित्र्याद् ऋजुकुटिल नाना पथजुषां, नृणामेको गम्यस्त्वमसि पयसामर्ण इव’’ ज्याप्रमाणे वेगवेगळ्या नद्यांचे पाणी शेवटी एकाच सागराला जाऊन मिळते, त्याप्रमाणे आपापल्या रुचीप्रमाणे वाटचाल करणारे सर्वजण एकाच सत्त्याकडे जातात.
भारतामध्ये मनुष्य, अन्य प्राणी व सृष्टी यामध्ये प्रचंड विविधता आहे, जणु जगातले सर्व वैविध्य भारतात एकवटले आहे. ही नियतीचीच योजना आहे. इतके वैविध्य असणार्‍या ठिकाणी एखादी पद्धती यशस्वी झाली तर ती जगात कुठेही यशस्वी होऊ शकेल. भारतात एके काळी या पद्धतीने व्यक्तीमात्रांसाठी त्यांच्यात्यांच्या आवश्यकतेप्रमाणे विकासाचे, पूर्णत्वप्राप्तीसाठी वाटचाल करण्याचे अगणित मार्ग उपलब्ध करून दिले, व त्याचबरोबर मूलभूत नियमांच्या - ज्यांना धर्म संबोधण्यात आले- प्रकाशात जीवनाच्या सर्व क्षेत्रातील समस्यांचे निराकरण करून एका आदर्श मानवी समाजाची जडण घडण केली. तेच या प्राचीन राष्ट्राचे चिरंतन जीवितकार्य होते व आहे.
वैद्यकक्षेत्रात आज याच अधिष्ठानावर उपलब्ध सर्व माहिती व तंत्रज्ञानाचा वापर करून आयुर्वेदाधिष्ठीत नवी वैद्यकव्यवस्था उभी करण्याची जवाबदारी व्यासपिठावर आहे. आज पाश्चात्य वैद्यकाच्या मर्यादा स्पष्ट होताहेत. एका मृत व्यक्तीच्या थडग्यावर त्याच्या मुलाने लिहिले होते, “In memory of my father, gone to join, his appendix, tonsils, olfactory nerve, a kidney, an eardrum and a leg prematurely removed by an intern, who needed experience.” त्यामुळे दुसर्‍याi कोणीतरी त्याच्या गरजेप्रमाणे तयार केलेल्या साच्याचे अंधानुकरण न करता मा. दत्तोपंत ठेंगडींनी निर्दिष्ट केल्याप्रमाणे “ आम्ही आमच्या संस्कृती व परंपरेच्या प्रकाशात, आजच्या आवश्यकतांनुरूप व भविष्याच्या आकांक्षांना पूर्ण करणार्‍या प्रगती व विकासाच्या आराखड्याचे चिंतन केले पाहिजे.” (“We must conceive of our own model of progress and development in the light of our own culture, our past traditions, present requirements and aspirations for future.”)
ही जवाबदारी पूर्ण करण्यासाठी व्यासपिठाची एक शक्तीसंपन्न संघटना म्हणून उभारणी करावी लागेल. या संघटनेसाठी आपल्या ध्येयाचे स्पष्ट ज्ञान असणारे स्नेहशील कार्यकर्ते जेंव्हा सातत्याने स्वत:ला झोकून देऊन सक्रीय होतील तेव्हाच हे कार्य पूर्ण होईल. “ज्ञानिभ्यो व्यवसायिन:” बाबा आमटेंनी सार्थक जीवनाची व्याख्या “सातत्याने विधायक कार्यात सक्रीय राहाणे” अशी केली आहे. (Continuous creative activity). काम करतांना अनंत अडचणी येतील. समुद्राच्या किनार्‍यावर एक जण बराच वेळ उभा होता, दुसर्‍याने विचारले ‘कशासाठी उभा आहेस ?’ त्याने उत्तर दिले ‘स्नान करायचे आहे पण लाटा थांबण्याची वाट बघतो आहे’ अडचणीच्या लाटा येतच राहातील, त्यांच्यावर स्वार होऊन काम करावे लागेल. हा अभ्यासवर्ग त्यासाठीच आहे. अभ्यासवर्ग म्हणजे लक्ष्याच्या दिशेने प्रत्यंचा ताणलेले धनुष्य आहे, धनुष्यातून सुटणारा बाण म्हणजे आपण कार्यकर्ते आहोत. धनुष्यातून सुटलेला बाण मध्ये कुठेही न थांबता लक्ष्याचा वेध घेतो तद्वतच मध्ये न थांबता आपला संकल्प पूर्ण होईपर्यंत आपल्याला काम करायचे आहे. स्वामी विवेकानंदांच्या शब्दात “Arise, awake and stop not till the goal is reached.”

***

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा