गुरुवार, २४ नोव्हेंबर, २०११

आरक्षण प्रकरणी सामंजस्यपूर्ण चर्चेची आवश्यकता

आरक्षण प्रकरणी सामंजस्यपूर्ण चर्चेची आवश्यकता
आयुर्वेद व्यासपिठाचे आवाहन

आयुर्वेद व्यासपीठ हे आयुर्वेदाशी संबंधित सर्व घटकांना संघटित करून वैद्यक क्षेत्रातील आजच्या समस्या सोडवण्यासाठी व्यापक परिवर्तन घडवून आणणारे संगठन आहे. त्याबरोबरच आयुर्वेद व्यासपीठ एकसंध व समरस समाजनिर्मितीसाठीही प्रतिबद्ध आहे.
आज आरक्षणाच्या प्रश्नावरून जो संघर्ष निर्माण झाला आहे तो अत्यंत दुर्दैवी आहे असे व्यासपिठाचे मत आहे. समाजाच्या सर्वांगिण विकासाच्या प्रक्रियेत समाजातील दुर्बल घटकांचा विकास हा अग्रक्रमाचा विषय असला पाहिजे किंबहुना समाजाच्या सर्वांगिण विकासाच्या प्रक्रियेत लवकरात लवकर कोणीही दुर्बल किंवा मागासलेला राहाणार नाही अशी स्थिती निर्माण करण्याचेच ध्येय सगळयांच्या समोर असले पाहिजे अशी व्यासपिठाची धारणा आहे. म्हणूनच जोपर्यंत समाजात वंचित दुर्बल घटक शिल्लक आहेत तोपर्यंत त्यांच्या विकासासाठी आरक्षण असलेच पाहिजे ही आयुर्वेद व्यासपीठाची भूमिका आहे.
परंतु या भूमिकेचा पाठपुरावा करतांनाच आरक्षणाच्या प्रावधानामागचे उद्देश साध्य होतील व खरोखरच दुर्बल किंवा मागासलेल्या समाज घटकांनाच त्याचा लाभ होईल अशाच रितीने त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे असे आयुर्वेद व्यासपीठाला चाटते. खरे वंचित दूर राहून तथाकथित मागासलेल्या जातीतील प्रगत व विकसित व्यक्तीच जर आरक्षणाचा लाभ घेत असतील तर तो आरक्षणाच्या धोरणाचा पराभव मानला पाहिजे. आज आरक्षणविरोधी वातावरण निर्माण होण्यामागे हेही एक कारण आहे हे समजून घेतले पाहिजे.
कुठल्याही समस्येचा राजकीय लाभासाठी वापर करण्याची जी घातक परंपरा निर्माण झाली आहे तिने आरक्षणाची समस्या चिघळवली आहे. क्षुद्र राजकीय स्वार्थासाठी समाजात विद्वेष निर्माण करणारे बेजवाबदार राजकारणी या संघर्षामागचे खरे गुन्हेगार आहेत. आरक्षणाचे समर्थन व विरोध करणार्‍या राजकारण्यांना रस केवळ मतपेटीच्या राजकारणात आहे हे ओळखून या आंदोलनात उतरणार्‍यांनी आपण स्वार्थांध राजकारण्यांच्या हातातले बाहुले बनणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.
आज असंख्य भीषण समस्यांनी ग्रस्त समाजाला विद्वेषाच्या खाईत लोटणार्‍या संघर्षापासून वाचवण्यासाठी आरक्षणासारखे विषय राजकारण्यांच्या पकडीतून सोडवून निकोप व एकसंध एकरस समाजनिर्मितीसाठी झटणार्‍या सर्व संघटना व चळवळींनी परस्परातले पूर्वग्रह व अभिनिवेष बाजूला ठेवून त्यावर सामंजस्यपूर्ण वातावरणात सर्वंकष चर्चा करण्याची गरज आहे.
आज हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे व न्यायालयाने जी समतोल भूमिका या संदर्भात घेतली आहे तिचा सर्वांनीच आदर करून सध्या सुरू असलेले आंदोलन स्थगित करावे व सामंजस्यपूर्ण चर्चेसाठी पोषक वातावरण निर्माण करावे असे सर्व संबंधित घटकांना व्यासपिठाचे कळकळीचे आवाहन आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा