शनिवार, १७ डिसेंबर, २०११

कार्यकर्त्याचा विकास

कार्यकर्त्याचा विकास
आयुर्वेद व्यासपीठ अभ्यासवर्ग
सांगली 27.5.01

आधीच्या सत्रांमध्ये विविध जिल्ह्यातील कार्यवृत्त आपण ऐकले, त्यातून व्यासपिठाच्या विविध उपक्रमांची व संघटनेच्या विस्ताराची कल्पना आपल्याला आली असेल. शास्त्रचर्चेच्या सत्रातून आपल्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या असतील. व्यासपिठाच्या सर्व उपक्रमांमध्ये अभ्यासवर्गाचे स्थान वैशिष्ठ्यपूर्ण आहे. अन्य उपक्रमांमध्ये विविध कार्यक्रमांची योजना आपण करतो. पण संघटना ज्या विचारांवर अधिष्ठीत आहे, त्या विचारप्रणालीचा व ही विचारप्रणाली प्रत्यक्षात आणण्यासाठी स्विकारलेल्या कार्यपद्धतीची ओळख अभ्यासवर्गात होते.
पुष्कळदा कार्यक्रमांच्या घाइगर्दीत ज्या उद्दिष्टांसाठी काम करतो आहोत, त्यांचा विचार करायला वेळ मिळत नाही व मग कार्यक्रम भरपूर व प्रभावी झाले तरी काम दिशाहीन होते. कधीकधी उद्दिष्टांचा, ध्येयधोरणांचा विचार खूप होतो, पण त्या प्रक्रियेत कामाची गती मंदावते. संघटनेचे काम व्यवस्थित चालण्यासाठी दिशा आणि गती दोन्हीत संतुलन आवश्यक आहे.
अभ्यासवर्गात आपण आपल्या संघटनेच्या निर्मिती मागची पार्श्वभूमी, उद्दिष्टे, ध्येयधोरणे व कार्यपद्धती समजाऊन घेतो, त्याची उजळणी करतो. उजळणी साठी इंग्रजीत Revision शब्द आहे, एकाने त्याचा फार सुंदर अर्थ सांगितला आहे; Revision gives you a new vision आपल्या संस्कृतीत पारायण शब्द आहे, त्यामागे हाच दृष्टीकोन आहे.
संघटनेच्या कामाचा आधार असतो कार्यकर्ता, संघटनेची चेतनाशक्ती असतो कार्यकर्ता. कार्यकर्त्याच्या क्षमतेनुसार, कल्पकतेनुसार काम उभे राहाते, अर्थात कार्यकर्त्याच्या क्षमता व कल्पकते सारखेच त्याच्या मर्यादांचे व गुणदोषांचेही परिणाम कामात उमटतात. विवेकानंद शीलास्मारक व केंद्राचे शिल्पकार मा. एकनाथजी रानडे असे म्हणत असत की कार्यकर्त्याकडे पाहिले की कार्यक्षेत्रातल्या त्याच्या कामाची कल्पना करता येऊ शकते व एखाद्या कार्यक्षेत्रातले काम बघितले की त्यावरून कार्यकर्त्याची कल्पना करता येऊ शकते. कार्यकर्ता हा त्याच्या कार्यक्षेत्रापुरता त्या संघटनेचे प्रतीक असतो, साकार रूप असतो. त्यामुळे स्थानिक कार्यकर्त्याच्या व्यवहारानुसार, गुणवत्तेनुसार स्थानिक लोकांच्या संघटनेविषयी धारणा तयार होतात. कम्युनिस्ट रशियाचा पहिला राष्ट्रप्रमुख लेनिन याला अशी सवय होती की देशातला सामान्य कामगार, शेतकर्या.ला काय वाटते हे जाणून घेण्यासाठी तो अचानक एखाद्या सामान्य कामगार, शेतकर्यारच्या झोपडीत जाऊन त्याच्याशी गप्पा मारायचा. एकदा अशाच गप्पा झाल्यावर तो शेतकरी त्याला म्हणाला ‘काय गंमत आहे पाहा, तुमचे नाव लेनिन आहे आणि देशाच्या प्रमुखाचे नावही लेनिन आहे. तो तुमच्याइतका चांगला असता तर किती बर झाल असत ?’
म्हणून संघटनेच्या उपक्रमात कार्यकर्त्याचा विकास हा महत्वाचा भाग असतो. विकासाचा उपक्रम म्हणून काही स्वतंत्र उपक्रम नसतो, तर छोट्यामोठ्या कार्यक्रमातून, बैठकांमधून, अभ्यासवर्गातून व सगळ्यात महत्वाचे म्हणजे अनौपचारिक गप्पा, चर्चा व जेष्ठ कार्यकर्त्यांच्या सहवासातून ही विकासाची जडणघडण होत असते. पण एक कार्यकर्ता म्हणून आपणही यासाठी सातत्याने व सक्रीय प्रयत्न करायला हवे. ज्याप्रमाणे व्यक्तिगत जीवनात एक व्यक्ती म्हणून, एक कुटुंबप्रमुख म्हणून, एक वैद्य म्हणून आपली प्रगती व्हावी, उत्कर्ष व्हावा अशी महत्वाकांक्षा ठेवतो, त्यासाठी धडपड करतो, कष्ट करतो, जे अगदी स्वाभाविक व उचितच आहे, त्याचप्रमाणे एक कार्यकर्ता म्हणूनही माझी प्रगती झाली पाहिजे, विकास झाला पाहिजे यासाठी पण धडपड, कष्ट केले पाहिजे. आपली क्षमता, गुणवत्ता व कार्यकुशलता वाढली पाहिजे यासाठी सतत प्रयत्न केले पाहिजे.
संघटनेचे काम करतांना सगळ्यात पहिले उद्दिष्ट म्हणजे संघटना अधिकाधिक व्यक्तींपर्यंत पोहोचवणे. हे पोहोचवण्याचे काम होते संपर्कातून, भेटीगाठीतून. या भेटीगाठींमुळे नव्यानव्या व्यक्ती संघटनेशी जोडल्या जातात, त्यातून शक्तीसंचय होतो. हा शक्तीसंचय अंकगणिताप्रमाणे Arithmetic progression(5+5=10) न होता भूमितीय पद्धतीने Geometric progression (5x5=25) होतो. या संपर्काचा आधार आत्मियता असला पाहिजे.
To meet is to know
To know is to understand
And to understand is to love
म्हणून भेटीगाठींसाठी वेळ दिला पाहिजे. त्यातही या भेटीगाठी प्रत्येकवेळा कामासाठी, कामापुरत्या नको. सहज, अनौपचारिक भेटीतून जे संबंध निर्माण होतात ते अधिक मजबूत असतात.
संपर्कातून, नव्यानव्या व्यक्ती संघटनेशी जोडल्या जातात, पण संघटनेशी त्यांचे नाते जडते ते संस्कारांमुळे. असे संस्कार भाषणाने होत नाहीत, ते होतात व्यवहारातल्या प्रत्यक्ष अनुभवाने, कार्यकर्त्यांच्या वागण्याने. केरळमध्ये संघाचे काम प्रभावी होत होते, त्यामुळे कम्युनिस्ट अस्वस्थ झाले, त्यांनी त्यांच्या एका कार्यकर्त्याला संघाच्या कामाचे रहस्य शोधून काढण्यासाठी शाखेत जायला सांगितले. वेळोवेळी ते त्याला त्याबद्दल विचारत, त्याला काहीच सांगता येत नसे, होताहोता त्याचा साम्यवादावरचा विश्वास उडाला व संघातील अनौपचारिक, आत्मियतापूर्ण वातावरणामुळे तो संघाशी जोडल्या गेला व संघाचा प्रचारक झाला.
संघटनेच्या निकोप वाढीसाठी ते काम कार्यकर्त्यांच्या संचाच्या प्रयत्नातून Teamwork उभे राहाणे आवश्यक असते. नील आर्मस्ट्रॉंगने चंद्रावर पहिले पाऊल ठेवले. नंतर एका भेटीत भारतीय अंतरिक्ष विज्ञानाचे प्रवर्तक श्री विक्रम साराभाईंनी त्याला त्याच्या यशाचे रहस्य विचारले. त्याने उत्तर दिले की चंद्रावर पाय ठेवणारा मी एकटा असलो तरी त्याच्या पाठीमागे पृथ्वीवर काम करणार्याा हजारो लोकांचे नियोजनबद्ध, मन:पूर्वक व अचुक सामुहिक परिश्रम होते.
सामुहिक प्रयत्नांइतकेच महत्व वाट्याला येईल ते काम आनंदाने स्विकारण्याला व मन:पूर्वक पार पाडण्याला आहे. संघटनेने सोपवलेले कुठलेही काम छोटे किंवा हलके न मानता ते तितक्याच तळमळीने करणे आवश्यक असते. 1916 च्या हिवाळ्यात कॉंग्रेसचे अधिवेशन लखनौला होते, लखनौला त्यावेळी कडाक्याची थंडी होती. पहाटे बाहेर गावाहून येणार्यास प्रतिनिधींना असे दिसले की कोणीतरी चुलीवर पाणी गरम करतो आहे, जवळ गेल्यावर लक्षात आले की ते लोकमान्य टिळक होते. बाहेरून येणार्याी माझ्या कार्यकर्त्यांना लखनौच्या थंडीची सवय नाही, त्यांच्यासाठी गरम पाणी आवश्यक आहे, ही तळमळ त्यामागे होती. राजसूय यज्ञात महाराज युधिष्ठीर कामे वाटून देत असतांना भगवान श्रीकृष्णांनी स्वत:कडे उष्ट्या पत्रावळी गोळा करण्याचे काम घेतले होते.
कार्यकर्त्याच्या विकासात अनुशासनालाही फार महत्व आहे. एका पंक्तीमध्ये संघाचे सरसंघचालक श्रीगुरूजीही भोजनासाठी बसले होते, व्यवस्थेमध्ये असलेल्या कार्यकर्त्याला वाटले की भोजन संपल्यावर सगळे एकदमच उठले तर श्रीगुरूजींना बाहेर पडायला अडचण होईल, म्हणून त्याने सूचना दिली की कोणीही स्वयंसेवक जागेवरून उठणार नाही व श्रीगुरूजींना उठण्यासाठी विनंती केली. श्रीगुरूजी त्याला म्हणाले ‘अरे मी पण एक स्वयंसेवक आहे, तूच सूचना दिली आहेस की ‘कोणीही स्वयंसेवक जागेवरून उठणार नाही’, मी पण जागेवरून उठणार नाही’, व्यवस्थेतल्या कार्यकर्त्याला आपली चूक लक्षात आली, त्याने सूचना दिली की सगळे उठू शकतात. संघाच्या सर्वोच्च पदावर असूनही ‘मी एक स्वयंसेवक आहे, व स्वयंसेवकासाठी असणारे नियम मलाही लागू आहेत’ ही श्रीगुरूजींची धारणा होती.
कार्यकर्त्यावर सोपवलेले काम नीट पार पाडता येण्यासाठी त्याला विविध प्रकारच्या कामातली कुशलता आत्मसात करावी लागते. एखाद्या कामाचे, कार्यक्रमाचे नियोजन करणे, पूर्वतयारी करणे, प्रत्यक्ष कार्यक्रमाचे संचालन करणे, पाठपुरावा करणे अशी विविध प्रकारची कामे करण्यासाठी अभ्यास व अनुभवातून कौशल्य संपादन करावे लागते. त्यासाठी जागरुक राहून प्रयत्न करावे लागतात. अ. भा. विद्यार्थी परिषदेचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री. यशवंतराव केळकर एका कार्यक्रमात बोलत असतांना श्रोत्यांमध्ये बसलेले जेष्ठ पत्रकार श्री. पा.वा. गाडगीळ टिपण काढत होते. नंतर यशवंतराव त्यांना म्हणाले ‘माझ्या व्याख्यानाची टिपणे कशासाठी’? त्यावर पा.वा. गाडगीळ म्हणाले ‘प्रत्येकाच्याच बोलण्यातून काही ना काही शिकण्यासारखे असतेच’. बोलण्यात नेमकेपणा हवा. संघाचे एक जेष्ठ आणि श्रेष्ठ कार्यकर्ते मा. श्री. मोरोपंत पिंगळे यांच्याबद्दल बोलतांना मा. प्रल्हादजी अभ्यंकर म्हणाले होते, ‘बरेचदा लोक बोलतात खूप, पण सांगत काहीच नाहीत, मोरोपंत बोलले थोडे, पण त्यांनी सांगिपले खूप’. इंग्लंडचे एकेकाळी पंतप्रधान असलेले व चतुरस्त्र व्यक्तीमत्व असलेले श्री. विंस्टन चर्चिल यांना एकदा प्रश्न विचारल्या गेला ‘एखाद्या विषयावर एक तास बोलण्यासाठी किती वेळ पूर्वतयारीला लागेल?’ चर्चिल म्हणाले ‘एक दिवस’. मग विचातल्या गेले ’ पंधरा मिनिटे बोलण्यासाठी?’ चर्चिल म्हणाले ‘पंधरा दिवस’.
काम करतांना प्रचंड चिकाटीची गरज असते. माकडाच्या गोष्टीतल्यासारखे कोय रुजली की नाही ते रोज उकरून पाहिले तर कोय कधीच रुजणार नाही. गर्भाच्या निकोप व सुरळित वाढीसाठी जसा गर्भधारणेचा निश्चित कालावधी असतो, तद्वतच प्रत्येक कार्यकर्त्याच्या, संघटनेच्या विकासासाठी एक Period of gestation’ असतो, तोपर्यंत चिकाटीने प्रतिक्षा करावी लागते. घाई केली तर abortion किंवा premature delivery होण्याची शक्यता असते. वैकुंठ मार्गावर निघालेल्या नारदांना तप करणार्या एका ऋषींनी चित्रगुप्ताकडे चौकशी करायला सांगितले ‘मोक्ष मिळण्यासाठी अजून किती दिवस तप करावे लागेल?’ नारद पुढे गेल्यावर दुसर्याय एका ऋषींनीही चित्रगुप्ताकडे अशीच चौकशी करायला सांगितले. काही दिवसांनी नारद परतले. दुसरे ऋषी त्यांना आधी भेटले, त्यांना ते म्हणाले ‘चित्रगुप्ताच्या नोंदीनुसार तुम्हाला अजून चाळीस वर्षे तप करावे लागेल’ हे ऐकून त्या ऋषींनी उद्वेगाने कपाळावर हात मारला. पुढे नारदांना पहिले ऋषी भेटले, त्यांना नारद म्हणाले ‘चित्रगुप्ताच्या नोंदीनुसार तुम्हाला अजून, ज्या झाडाखाली तुम्ही तप करीत आहात, त्या झाडाला जितकी पाने आहेत तितकी वर्षे तप करावे लागेल’ हे ऐकून त्या ऋषींनी आनंदाने नाचायला सुरूवात केली, नारदांनी त्यांना आश्चर्याने विचारले ‘निराशेऐवजी तुम्हाला आनंद कसा झाला?’ ते ऋषी म्हणाले ‘झाडाला पाने खूप आहेत, पण असंख्य तर नाहीत. इतक्या वर्षानंतर का होइना पण मोक्ष नक्की मिळणार ही परमानंदाची गोष्ट आहे’ कथेत पुढे असे सांगितले आहे की आनंदाने नाचतानाचताच त्यांना मोक्षप्राप्ती झाली.
स्थायी स्वरुपात काम उभे राहाण्यासाठी कामात सातत्याची गरज असते. श्रीरामकृष्ण परमहंसांना एकदा एकाने प्रश्न विचारला की आपण असे मानतो की गंगेत स्नान केल्याने सर्व पापे नष्ट होतात, पण व्यवहारात असे दिसते की रोज लाखो व्यक्ती गंगेत स्नान करतात पण त्यांच्या जीवनात असे काही आढळत नाही, असे का? श्रीरामकृष्ण त्याला गमतीने म्हणाले, ‘गंगेच्या काठावर मोठे वृक्ष आहेत. जेव्हा लोक स्नानाला जातात तेंव्हा त्यांची पापे या वृक्षांवर जाऊन बसतात, आणि जेंव्हा लोक स्नान करून बाहेर येतात तेंव्हा त्यांची पापे परत त्यांच्या मानगुटीवर बसतात.’ त्यांच्या म्हणण्याचा उद्देश्य हा होता की एकदा पुण्यकर्म केले म्हणजे पाप नष्ट होणार नाही, त्यासाठी सातत्याने पुण्यकर्म करत राहाण्याची गरज आहे. मा. बाबा आमटे यांनी यशस्वी जीवनाची व्याख्या “Continuous creative activity” अशी केली आहे. म्हणजे सातत्याबरोबर रचनात्मकताही पाहिजे. भुकंपग्रस्त भागातील एका मुलाला काही दिवसांसाठी नातेवाइकांकडे पाठवण्यात आले, काही दिवसातच नातेवाइकांचा निरोप आला की मुलाला घेऊन जा, भुकंप इकडे पाठवला तरी चालेल. सातत्याने विध्वंसक कामात गुंतलेल्यांची संख्या कमी नाही, म्हणून सातत्याबरोबरच रचनात्मकताही हवी. पण सातत्याने रचनात्मक ‘चिंतन करणार्यांखची संख्याही कमी नाही, रविंद्र पिंगेनी बोनसाय कादंबरीत Intellectuals म्हणजे काय याचे वर्णन diarrhea of words and constipation of ideas असे केले आहे. म्हणून त्याला कार्यशीलतेची जोड हवी. यासाठी कार्यकर्त्याच्या जीवनात अखंड विधायक कामाचे दर्शन हवे.
प्रत्येकजण संघटनेशी कुठल्यानाकुठल्या निमित्ताने जोडल्या जातो, मग ती व्यक्ती असेल, एखादा कार्यक्रम असेल, एखादा प्रसंग असेल किंवा एखादा विचार असेल. पण हळूहळू कार्यकर्ता संघटनेच्या ध्येयाशी जोडल्या जायला हवा, आणि कामाची सुरूवात जरी कोणीतरी सांगितले म्हणून काम करण्याच्या प्रेरणेपासून झाली असली तरी हळूहळू त्याचे रुपांतर स्वत:हून स्विकारलेले, स्वत:हून करायचे ठरवलेले कार्य यात व्हायला हवे. श्री. विष्णूमहाराज पारनेरकरांनी काम आणि कार्य यातला फरक सांगतांना ‘काम म्हणजे कोणीतरी सांगितले म्हणून करतो ते आणि कार्य म्हणजे स्वत:हून करतो ते’ असे सांगितले आहे. यातून कर्यकर्त्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो. संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार संघाच्या सुरुवातिच्या काळात शाखा सुटल्यानंतर त्या वस्तीतल्या एखाद्या प्रतिष्ठिताच्या घरी जात व सोबतच्या कार्यकर्त्यांची ओळख करून देत, ‘हा नववीत शिकणारा बाळ देवरस, आमच्या शाखेचा कार्यवाह आहे’, ती प्रतिष्ठित व्यक्ती डॉक्टरांना चेष्ठेने म्हणत असे ‘काय डॉक्टर, या शेंबड्या मुलांना घेऊन तुम्ही हिंदूराष्ट्र घडवणार?’ पण डॉक्टरांचा जबर आत्मविश्वास कालांतराने खरा ठरला आणि नववीत शिकणारा बाळ देवरस एक दिवस संघाला राष्ट्रजीवनाच्या केंद्रस्थानी नेऊन ठेवणारा संघाचा सर्वोच्च नेता बनला.एकदा कॉंग्रेसचे एक पुढारी संघाच्या कार्यकर्त्याला म्हणाले ‘गेले तीस दिवस तीस गावी टांगा घेऊन फिरतो आहे, पण एक माणूस हाताला लागेल तर शपथ !’ शेजारी उभा असलेला एक बाल स्वयंसेवक म्हणाला ‘लहान तोंडी मोठा घास वाटेल, पण तीस दिवस तीस गावी फिरण्यापेक्षा एकाच गावी फिरला असतात तर काम झाले असते.’ मद्रासला संघाच्या कार्यालयात अतिरेक्यांनी केलेल्या बॉम्बस्फोटानंतर जखमींना भेटायला रुग्णालयात तामिळनाडूच्या तत्कालीन मुख्यमंत्री जयललिता आल्या होत्या. एका जखमी मुलाला भेटतांना त्या म्हणाल्या ‘काही काळजी करू नकोस, तुमच्या संपूर्ण उपचाराची काळजी सरकार घेईल’, तो बाल स्वयंसेवक म्हणाला ‘ आमच्या उपचाराची काळजी घेण्यास संघ समर्थ आहे, तुम्ही अतिरेक्यांचा बदोबस्त करा.’
आत्मविश्वासाने काम करणे आवश्यक असले तरी आत्मविश्वासाचे रुपांतर अहंकारात होऊ नये याची काळजी घ्यायला हवी. जनसंघाच्या कार्यालयात एकदा संध्याकाळी एका कार्यकर्त्याला दीनदयाळजी उपाध्याय अंगणात शेकोटी पेटवतांना दिसले. त्याने जवळ जाऊन पाहिले तर त्याला दिसले की दीनदयाळजी त्यांची प्रमाणपत्रे शेकोटीत टाकीत आहेत. अतिशय कुशाग्र बुद्धीचे असल्याने दीनदयाळजींनी शालेय व महाविद्यालयीन परिक्षा प्रथम श्रेणीत प्रथम क्रमांकांनी उत्तीर्ण केल्या होत्या. त्या कार्यकर्त्याने आश्चर्याने दीनदयाळजींना या शेकोटीचे कारण विचारले, ते शांतपणे म्हणाले ‘माझे जीवन मे आता संघाला समर्पित केले आहे, या प्रमाणपत्रांची आता गरज काय?’ संघाचे द्वितीय सरसंघचालक श्री. गुरूजी केरळमध्ये एका वैद्यराजांचे उपचार घेण्यासाठी गेले होते. तिथल्या प्रथेप्रमाणे वैद्यराज त्यांना म्हणाले ‘उपचारांच्या प्रारंभी आपण दोघे मिळून परमेश्वराची प्रार्थना करू की या उपचारात आम्हाला यश येऊ दे’ श्रीगुरूजी अतिशय विनम्रपणे त्यांना म्हणाले ‘आजपर्यंत मी परमेश्वराकडे स्वत:साठी काही मागितले नाही, व आताही मागणार नाही’ स्तंभित झालेले वैद्यराज उद्गारले ‘हा पुण्यात्मा आहे’
कार्य करतांना समाजासाठी सर्वस्व अर्पण केलेल्या अशा कार्यकर्त्यांचे स्मरण सतत असले पाहिजे. अशा कार्यकर्त्यांचे जीवन कवीश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या शब्दातून आपल्याला उमजू शकेल...
‘पदोपदी पसरून निखारे आपुल्याच हाती,
होउनिया बेहोष धावलो ध्येयपथावरती
कधी न थांबलो विश्रांतीस्तव पाहिले न मागे,
बांधु न शकले प्रितीचे वा किर्तीचे धागे
एकच तारा समोर आणिक पायतळी अंगार, होता पायतळी अंगार
गर्जा जयजयकार क्रांतिचा गर्जा जयजयकार’
ज्ञातअज्ञात अशा हजारो महापुरुषांचे आणि क्रांतिकारकांचे आत्मसमर्पण या समाजाच्या उत्थानासाठी झालेले आहे. कल्पवृक्षाखाली बसून केलेली प्रत्येक इच्छा पूर्ण कशी होते या प्रश्नाचे उत्तर देतांना वशिष्ठ ऋषी म्हणाले की या वृक्षाखाली बसून असंख्य ऋषीमुनींनी खडतर तपश्चर्या केलेली आहे, त्या तपश्चर्येमुळे या वृक्षात हे सामर्थ्य निर्माण झाले आहे व या वृक्षाचा कल्पवृक्ष झाला आहे. समाजसंघटनेच्या कार्यात अशा शेकडो कार्यकर्त्यांनी अशीच तपश्चर्या केलेली आहे. संघटनेचे काम करतांना हे भान जागे असले म्हणजे कार्यकर्त्यांची पाऊले योग्य दिशेनेच पडतात.
काम करतांना संघटनेचे जीवितकार्य काय व आपल्यासमोरचे लक्ष्य काय याचे अवधान सतत असले पाहिजे. कधीही मैदानावर पाय न ठेवलेल्या एका माणसाने फुटबॉलच्या एका सामन्यात भाग घेतला. सामना संपल्यावर घरी पत्नीला तो सांगत होता ‘तासभर मैदानावर नुसता धावत होतो’ दमलेल्या पतीचे पाय चेपताचेपता पत्नीने कौतुकाने विचारले ‘मग किती गोल मारले तुम्ही?’ ‘गोल ?, अग या तासाभरात माझ्या पायाचा चेंडुला एकदाही स्पर्श झाला नाही’ पती उत्तरला ! कामाच्या धावपळीत आपलेही असे होत नाही ना याची दक्षता घेतली पाहिजे. या समाजाचे, राष्ट्राचे उत्थान हे आमचे लक्ष्य आहे. एक चिमुरडी मुलगी म्हणाली ‘मै उन्नत भारत ने जीना चाहती हू’ आणि अब्दुल कलामांचा भारताचा कायापालट करण्याचा संकल्प गतिमान झाला. आदर्श मानवी जीवनाची उभारणी हे भारतीय जीवनदर्शन आहे. जगाच्या पाठीवर अनेक संस्कृतींचा उदयास्त झाला, पण भारतीय संस्कृती टिकून आहे. म्हणूनच कवी इक्बाल म्हणतो
‘यूनान मिस्र रोमां सब मिट गए जहासें, कुछ बात है कि हस्ती मिटती नही हमारी’
आज जगालाही याची जाणीव होते आहे. एकेकाळी जगातल्या सगळ्यात धनाढ्य व्यक्तीत गणना होणार्‍या प्रसिद्ध उद्योगपती हेन्री फोर्ड यांचा नातू आज हरे रामा हरे कृष्णा म्हणत विचारतो आहे ‘Wealth? Who’s wealth? All the wealth belongs to Lord Krishna.’ रशियाच्या एकेकाळच्या सर्वसत्ताधीश स्टॆलीनची मुलगी स्वेतलाना गंगाकिनारी एक झोपडी बांधून तिथेच अखेरचा श्वास घेण्यात धन्यता मानते. कारण जगातल्या यच्च्ययावत मानवांना त्यांच्या प्रकृतीनुरूप मुक्तीचे मार्ग उपलब्ध करून देणारी भारतीय संस्कृती हेच आज जगाचे आशास्थान आहे.
“ऋचिनां वैचित्र्याद् ऋजुकुटिल नाना पथजुषां, नृणामेको गम्यस्त्वमसि पयसामर्ण इव’’
ज्याप्रमाणे वेगवेगळ्या नद्यांचे पाणी शेवटी एकाच सागराला जाऊन मिळते, त्याप्रमाणे आपापल्या रुचीप्रमाणे वाटचाल करणारे सर्वजण एकाच सत्त्याकडे जातात.’
आयुर्वेदाची ध्वजा खांद्यावर घेतलेल्या आम्हा सर्वांनाही वैद्यकक्षेत्रात ही भूमिका पार पाडायची आहे.
एतद्देश प्रसूतस्य सकाशाद्अग्रजन्मन:
स्वं स्वं चरित्रं शिक्षेरन् पृथिव्या सर्वमानवा’
’या देशात जन्मलेले आम्ही सर्व आमच्या जीवनातून, पृथ्वीवरच्या सर्व मानवांना ज्ञान देऊ’ आयुर्वेदाचे एक नवे व्यापक, सर्वसमावेशक, आधुनिक, विजिगिषू रूप जगाला दाखवू.
समस्यांनी ग्रासलेल्या या देशात हे सामर्थ्य आहे. हिमाचल प्रदेशात पर्यटन करणार्या श्री. पुजारी यांना बारटोक या छोट्या खेड्यातल्या एका सामान्य चहाच्या टपरीवाल्याने एक कप चहा बिनसाखरेचा बनवला म्हणून साखरेचे पैसे परत दिले. हे या समाजाचे सामर्थ्य आहे. खलिस्तानी आतंकवाद्यांच्या विध्वंसाचा आगडोंब उसळलेल्या पंजाब मध्ये विक्रमी धान्योत्पादन घेणारा शेतकरी हे या देशाचे सामर्थ्य आहे. या सामर्थ्याच्या आधारावरच नव्या भारताचे स्वप्न साकार होणार आहे. If you can dream it, you can do it.
हे स्वप्न साकारण्यासाठी प्रत्येक कार्यकर्ता गाभार्‍या तील भारतमातेची प्रतिमा उजळवणारा नंदादीप बनला पाहिजे. त्यासाठी आपल्याला आपल्या आयुष्याची दिशा ठरवावी लागेल. ‘Most people are like falling leaf that drifts, turns, flutters and fall to the ground. Few others are like stars which travel a definite path. No wind reaches them. They have within themselves the path and the guide.’ Herman Hess in “Siddhartha”
आज संकटांनी वेढलेली भारतमाता तिच्या पुत्रांच्या पुरुषार्थाला आवाहन करते आहे, कवी म्हणतो
“शून्य तटोसे सर टकराकर, पूछ रही गंगाकी धारा,
सगरसुतोसेभी बढकर मृत, आज हुवा क्या भारत सारा.
यमुना रोती कहा कृष्ण है, शरयु कहती कहा राम है,
व्यथित गंडकी खोज रही है, चन्द्रगुप्त के धाम कहा है.
अर्जुन का गॉंडीव किधर है, कहा भीम की गदा खो गई,
किस कोने मे पॉंचजन्य है, कहा भीष्म की शक्ति सो गई.
कोटीकोटी पुत्रोकी माता, अब भी पीडित-अपमानित है,
जो जननि का दुख न मिटाये, उन पुत्रोपर लानत है.”
पण कार्यकर्त्यांनी हे आव्हान स्विकारले आहे, ते म्हणतात
“आखोमे वैभव के सपने, पगमे तुफानो की गति है,
राष्ट्र सिंधुका ज्वार न रुकता, आये जिसजिसकी हिम्मत हो.”

*** ** *

1 टिप्पणी: