शुक्रवार, १३ जानेवारी, २०१२

भारतीय संस्कृती व आयुर्वेद

भारतीय संस्कृती व आयुर्वेद
स्त्रीवैद्य अभ्यासवर्ग
पुणे 11.2.2001

सत्राचा विषय पाहून असा प्रश्न निर्माण होऊ शकतो की स्त्रीवैद्यांच्या अभ्यासवर्गात या विषयाचे प्रयोजन काय ? पण जर थोडा सखोल विचार केला तर आपल्या लक्षात येईल आयुर्वेद हे केवळ एक वैद्यकशास्त्र नाही तर ती भारतीय संस्कृतीच्या वाटचालीत उत्पन्न झालेली व विकसित झालेली जीवनपद्धती आहे, व म्हणून भारतीय संस्कृतीशी त्याचे नाते अतूट आहे. त्यामुळेच आयुर्वेदाच्या अभ्यासकाला भारतीय संस्कृतिचा अभ्यास करणे आवश्यक आहे.
अभ्यासवर्गाची रचना आपल्या संघटनेचे प्रयोजन समजून घेण्यासाठी असते. त्यासंदर्भात विचार करतांना आपल्याला हे लक्षात घ्यावे लागेल की व्यासपीठ हे केवळ आयुर्वेदीय संघटन नाही, तर भारतीय सांस्कृतिक वारशाच्या आधारावर नव्या भारताची उभारणी करण्याचे ते माध्यम आहे. त्यादृष्टीने हा वारसा समजून घेण्याची गरज आहे.
भारतीय संस्कृती ही जगाच्या पाठीवरची सर्वात प्राचीन संस्कृती आहे. अगदी टिकाकारांनी सुद्धा भारतीय संस्कृती ही किमान पाच हजार वर्षे प्राचीन असल्याचे मान्य केले आहे. डार्विनच्या सिद्धांतानुसार ‘जगण्याच्या संघर्षात’ (In the struggle for existence) जो सगळ्यात जास्त सक्षम असतो तोच टिकतो (Survival of the fittest). या न्यायाने काळाच्या ओघात सगळ्यात जास्त सक्षम असल्यामुळेच भारतीय संस्कृती टिकून आहे. एखादी संस्कृती जेंव्हा हजारो वर्ष टिकून राहाते तेंव्हा जीवनाच्या सर्व क्षेत्रातल्या सर्व समस्यांना उत्तरे शोधल्याशिवाय व अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, नगररचना, संपर्कसाधने अशा सर्व भौतिक विज्ञानात किमान प्रगती केल्याशिवाय ती टिकूच शकत नाही. ज्या अर्थी किमान पाच हजार वर्षे भारतीय संस्कृती टिकून आहे त्या अर्थी या संस्कृतीत जीवनाच्या सर्व क्षेत्रातल्या सर्व समस्यांना उत्तरे शोधण्याचा व सर्व भौतिक विज्ञानात किमान प्रगती करण्याचा यशस्वी प्रयत्न केल्या गेला होता यात शंका असण्याचे कारण नाही. या प्रदीर्घ कालावधीत जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रातल्या सर्व संभाव्य समस्या (All permutations and combinations of all sorts of problems in every walk of life) उत्पन्न झाल्या असणारच व त्यांना त्या त्या काळात त्यांचे योग्य त्या पद्धतीने निराकरण झाले असणारच. कारण जी संस्कृती समस्यांचे असे निराकरण करू शकत नाही, ती काळाच्या ओघात नष्ट होते हा जगाचा इतिहास आहे.
त्यामुळे आरोग्याच्या क्षेत्रातही हजारो वर्षांच्या कालावधीत सर्व प्रकारचे मानस शारीर आजार, सर्व प्रकारचे संक्रामक रोग, अपघातजन्य गंभीर अवस्था, अशा सर्व समस्या उत्पन्न झाल्या असणारच, ज्यांची उत्तरे शोधल्याशिवाय मानवी जीवनातले सातत्य टिकून राहूच शकत नाही. कालौघात निर्माण होणार्‍या सर्व समस्यांची उत्तरे शोधण्याची क्षमता हे आयुर्वेदाचे अंगभूत सामर्थ्य आहे. व याच सामर्थ्याच्या बळावर आजही एक प्रभावी वैद्यकशास्त्र म्हणून ते टिकून आहे, नव्हे वैद्यांच्या नव्या पिढीच्या कर्तृत्वामुळे त्याला नवी झळाळी प्राप्त होते आहे.
भारतीय संस्कृतीची ही वैशिष्ठ्ये असली तरीही संस्कृतिच्या आजवरच्या वाटचालीत उत्थानपतनाचे अनेक चढउतार आले हे विसरता येणार नाही. ही महान संस्कृती ज्या देशात विकसित झाली तो देश शेकडो वर्षे पारतंत्र्यात होता हे विसरता येणार नाही, आणि आज स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक दशके उलटून गेल्यावरही हा देश आणि समाज अनेकानेक समस्यांनी ग्रस्त आहे हे नाकारता येणार नाही. देशावरचे आर्थिक संकट मोठे आहे, देशावर असलेल्या कर्जाचे व्याजच पंच्याहत्तरहजार कोटी रुपये आहे. स्वातंत्र्यदिनाच्या समारंभावर आतंकवादी हल्ल्याची टांगती तलवार असतेच. भाषा, प्रांत, जाती, पक्ष यांचा असहिष्णू अभिनिवेश समाजात परस्पर संघर्षाचे वणवे पेटवतो. चंगळवादाचे वाढते आक्रमण समाजाला ग्रासते आहे.
तरीही अशा सगळ्या संकटांना भूतकाळात यशस्वीपणे तोंड दिले असल्याने जगातल्या विचारवंतांना आजही भारत आशेचा एकमात्र किरण वाटतो. 1986 मध्ये मास्कोत भारत महोत्सवाचे उदघाटन करतांना मिखाईल गॉर्बाचेव्ह यांनी भाषणाची सुरूवात गीतेतल्या दुसर्या अध्यायातल्या
ध्यायतो विषयान्पुंस: संगस्तेषूपजायते!
संगात्सञ्जायते काम: कामात्क्रोधोभिजायते!! 62
क्रोधाद्भवति सम्मोह: सम्मोहात्स्मृतिविभ्रम:!
स्मृतिभ्रंशाद् बुद्धिनाशो बुद्धिनाशात्प्रणश्यति!! 63
या श्लोकांनी केली व गीतेचे तत्वज्ञानच जगाला मार्ग दाखवू शकते असे सांगितले. इंग्लंडच्या पंतप्रधान असलेल्या मार्गारेट थॅचर यांनी इंग्लंडमधील विराट हिंदू संमेलनात बोलतांना कुटुंब संस्थेसारख्या अनेक गोष्टी जगाने भारतीय संस्कृतीकडून शिकण्यासारख्या आहेत असे सांगितले. दक्षिण आफ्रिकेचे नेते नेल्सन मंडेला 27 वर्षांच्या प्रदीर्घ बंदीवासातून सुटल्यावर सर्वप्रथम भारताला भेट देण्याची इच्छा व्यक्त करतात. अटलजी पंतप्रधान झाल्यावर फ्रांसचे राष्ट्राध्यक्ष जॅक शिरॅक यांनी आगामी काळात भारत महासत्ता होईल असे भाकीत केले. चीनचे राजदूत चाउ गांग यांनी पुण्यात बोलतांना भारत चीन संबंध सुधारण्यावर भर दिला व आपण एकमेकांचे उपयुक्त, विश्वासार्ह सहनिवासी आहोत असे प्रतिपादन केले. इंडोनेशिया या जगातल्या सगळ्यात मोठ्या मुस्लिम देशाचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष अब्दुल वाहीद यांनी निवडून आल्यानंतर अग्रक्रमाने भारताला भेट दिली व भारताबरोबरचे संबंध दृढ करण्याची इछा व्यक्त केली. अटलजी पंतप्रधान झाल्यावर अमेरिकन संसदेत भारतीय लोकशाहीच्या स्वागताचा ठराव 396/4 मतांनी संमत करण्यात आला. भारतावर आर्थिक निर्बंध लादण्यात अमेरिकेची चूक झाली हे मान्य करण्यात आले व अमेरिकन अध्यक्षांना भारताबरोबर सहकार्य वाढवण्याची विनंती करण्यात आली. जपानने इतिहासात प्रथमच भारतीय तंत्रज्ञांना जपानमध्ये प्रवेश देण्यासाठी Multiple entry visa च्या नियमात बदल केले.
हे बदल होण्यामागे जसे भारतीय तत्वज्ञान व संस्कृतीची पार्श्वभूमी आहे तसेच भारताच्या बदलत्या स्वरूपाची वाढती जाणीव हेही एक कारण आहे. भारताच्या निर्यातीत 66% वाढ झाली आहे व पुढच्या वर्षीचे उद्दिष्ट 400 दशलक्ष डॉलर्सचे ठेवण्यात आले आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातला भारताचा वाटा दिवसेंदिवस वाढतो आहे. अर्थतज्ञांचे भाकीत असे आहे की अमेरिका आज 1929 सारख्याच भीषण मंदीच्या उंबरठ्यावर उभी आहे, व या मंदीत अमेरिकन अर्थसत्ता कोसळली तर भारत अमेरिकेची जागा घेऊ शकतो. याचे कारण असे आहे की भारतीय अर्थव्यवस्थेची काही बलस्थाने आहेत.
1. भारतीय अर्थव्यवस्थेचा जागतिक बाजारपेठेशी संबंध कमी आहे.
2. भारतात विदेशी निवेश कमी आहे.
3. भारताच्या एकूण व्यापारात सरकारचे स्थान मर्यादित आहे.
4. भारतातील सुदृढ व्यापारी वर्ग.
संरक्षण सिद्धतेत भारत आज जागतिक दर्जा गाठतो आहे. संरक्षण सिद्धतेत भारत आज जागतिक दर्जा गाठतो आहे. भारतीय संरक्षण दलात समाविष्ट झालेली त्रिशूल, पृथ्वी, अग्नी, आकाश, नाग सारखी अण्वस्त्रवाहक क्षेपणास्त्रे स्वसंरक्षण व आक्रमकांवर प्रत्याघात करण्यासाठी सज्ज आहेत. कारगिलच्या युद्धाने हे सिद्ध केले आहे की भारतीय सैनिक हा जगातला प्रथम श्रेणीचा सैनिक आहे. भारताचा अंतरिक्ष संशोधन विभाग आज चंद्रकक्षेत प्रवेश करण्याची तयारी करतो आहे. भारतातल्या राष्ट्रीय प्रयोगशाळांच्या साखळीमुळे वैज्ञानिकांच्या संख्येत भारत आज जगात तिसर्‍या क्रमांकावर आहे. अतिप्रगत संगणक निर्मितीत अनुराग, अनुपम, परम व परम दशसहस्त्र सारख्या अतिप्रगत संगणकांनी आंतर्राष्ट्रीय संगणक तंत्रज्ञान क्षेत्रात खळबळ माजवली आहे. या प्रगतीमुळेच मा. अब्दुल कलामांसारखे द्रष्टे शास्त्रज्ञ देशासमोर ‘Vision 2020’ मांडत आहेत. उद्योगपती श्री. फिरोदिया यांनी विदेशातल्या भारतियांना भारतात गुंतवणूक करण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार चीनची प्रगती होण्याचे एक महत्वाचे कारण म्हणजे विदेशातल्या चिनी उद्योगपतींनी चीनमध्ये केलेली मोठ्या प्रमाणातली गुंतवणूक आहे.
तीन तीन पिके घेता येण्यासारखी सुपिक व विस्तीर्ण जमीन जगात फक्त भारताजवळच आहे, ज्यामुळे भारत जगाचे अन्नाचे कोठार बनू शकतो. सर्व प्रकारच्या अपारंपारिक उर्जा स्रोतांचे भारत हे कोठार आहे. अभियांत्रीकीतील व श्रमशक्तीतील मनुष्यबळाच्या बाबतीत भारताचा हात कोणीही धरू शकत नाही. या सगळ्या बाबींमुळेच American intelligence community ने आपल्या ताज्या अहवालात असे म्हटले आहे की भारत, रशिया व चीन येणार्यात काळात पश्चिमेचा प्रभाव घटवणार आहेत.
भारताबाहेरील भारतीय वंशाचे लोक आपला प्रभाव दखवत आहेत. मॉरीशस, त्रिनिदाद, फिजी, गयाना व सिंगापूरचे राष्ट्रप्रमुख भारतीय वंशाचे आहेत. अमेरिकेतले 38% डॉक्टर्स, 12% शास्त्रज्ञ, नासामध्ये 36%, मायक्रोसॉफ्टमध्ये 34%, आयबीएममध्ये 28%, इंटेलमध्ये 17% व झेरॉक्समध्ये 13% भारतीय आहेत. लुंबिनीला झालेल्या विश्व बौद्ध संमेलनात भंते ज्ञानजगत व शंकराचार्य जयेंद्र सरस्वतींच्या नेतृत्वात जगातल्या 16 देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते, जे आजही बौद्ध तत्वज्ञानाचे उगमस्थान म्हणून भारताला वंद्य मानतात. योग, स्वाध्याय, विपश्यना, स्वामीनारायण, इस्कॉन, प्रजापिता ब्रह्मकुमारी, महर्षी महेश योगी या सर्वांना जगभर प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. आयुर्वेदाच्याही बाबतीत हे घडते आहे. या सांस्कृतिक दिग्विजयातून हळूहळू एका नव्या विश्वसंस्कृतीची उभारणी होते आहे. विश्व इतिहासाचे प्रख्यात भाष्यकार अर्नॉल्ड टॉयन्बी यांच्या द्रष्ट्या शब्दांची प्रचिती या सर्व घटनांमधून येते आहे. त्यांचे शब्द आहेत “मानवी इतिहासाच्या या अत्यंत भयंकर क्षणी मानवजातीसाठी मुक्तीचा एकमेव मार्ग हा भारतीय मार्ग आहे.” (At this supremely dangerous moment of human history, the only way of salvation for mankind is an Indian way.) जगातल्या सगळ्या विविधतांना सामावून घेणारे भारतीय जीवन दर्शन आहे. न्या. रानडे म्हणाले होते, ‘This land is a land of promises.’ एकेकाळी अमेरिकन तरुणांना उद्देशून Pearls Buck या लेखिकेने आपल्या Good earth या कादंबरीत असे म्हटले होते, “Its we, who are going to write the history of centuries to come” आज जर कोणाला हे म्हणायचा अधिकार व क्षमता असेल तर ती भारतीय तरुणांनाच आहे, या दुर्दम्य आत्मविश्वासाने व अभेद्य निश्चयाने काम करण्याची गरज आहे.
या संदर्भातली स्त्री वैद्यांची भूमिका महत्वाची आहे. विवाहाबद्दल एकाने असे म्हटले होते की ‘Marriage is not a word, it’s a sentence, a life sentence’ पण यातुनही कौशल्याने मार्ग काढण्याची क्षमता स्त्रियांच्यात असते. म्हणूनच स्त्रियांबद्दल एकाने म्हटले आहे ‘Women the fair magicians, who can turn men into donkeys and make them feel they are lions’ या क्षमतेचा वापर करून आपण कुटुंबाला व समाजालाही आयुर्वेदानुकुल बनवू शकता. काम करतांना अडचणी येणारच पण त्या बाजुला सारल्या पाहिजे. रात्री एका माणसाला नदी ओलांडून पलिकडे जायचे होते, तो नावेत बसला व त्याने नाव वल्हवायला सुरूवात केली, वल्हवता वल्हवता पहाट झाली व त्याच्या असे लक्षात आले की नाव रात्री जिथे होती तिथेच होती, कारण नाव ज्या दोरीने किनार्याावरच्या झाडाला बांधलेली होती, ती दोरी सोडायचा तो विसरला होता. आपणही आपल्याला बांधून ठेवणार्याव दोर्‍या सोडल्या तर व्यासपिठाची नाव आपण आपल्या उद्दिष्टापर्यंत निश्चितच घेवून जाऊ.
अभ्यासवर्ग म्हणजे लक्ष्याच्या दिशेने प्रत्यंचा ताणलेले धनुष्य आहे, धनुष्यातून सुटणारा बाण म्हणजे आपण कार्यकर्ते आहोत. धनुष्यातून सुटलेला बाण मध्ये कुठेही न थांबता लक्ष्याचा वेध घेतो तद्वतच मध्ये न थांबता आपला संकल्प पूर्ण होईपर्यंत आपल्याला काम करायचे आहे. स्वामी विवेकानंदांच्या शब्दात “Arise, awake and stop not till the goal is reached.”
****

1 टिप्पणी: